
पुणे : दि. ०९. स्वराघात व बलाघाताचा योग्य ठिकाणी केलेला वापर आणि अभिनयासह केलेले वाचन म्हणजे अभिवाचन होय. स्वतःपासूनच दुरावण्याच्या या युगात आपल्या सर्वात जवळची व शाश्वत असलेली गोष्ट म्हणजे मराठी साहित्याचा ठेवा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखक प्रा. संपत गर्जे यांनी केले.
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून चिंचवडमधील मोरया शिक्षण संस्थेतर्फे राज्यस्तरीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे संपन्न झाले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी अभिवाचनाच्या अविष्कारातून विविध साहित्यिकांचे अंतरंग उलगडले. श्यामची आई, राजा शिवछत्रपतींचा मावळा व एकनिष्ठ मालुसरे, मुक्या प्राण्यांची माया (कथा), नाट्य वाचन, काव्यवाचन दख्खनची राणी, पाण्याच्या ढिगावर बसून अशा विविध साहित्याचे अभिवाचन करुन मंत्रमुग्ध केले. दरम्यान, प्राचार्य इंद्रायणी माटे-पिसोळकर लिखित व दिग्दर्शित रात्रीस खेळ चाले व नवे गोकुळ या बालनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. सोमनाथ वाघमारे यांनी संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांमधून मराठी भाषेचे महत्त्व पटवून दिले. आंतरशालेय स्पर्धेचा निकाल : इयत्ता १ ली ते ४ थी : प्रथम – विरा खैरे, द्वितीय : स्वरा रासकर, तृतीय : तन्वी खडसे, उत्तेजनार्थ : अन्वी देशिंगे व आर्या देशपांडे, इयत्ता ५ वी ते ७ वी : प्रथम : निहिरा दिकोंडा, द्वितीय : अनन्या कंद, तृतीय : शार्दुल देशिंगे इयत्ता ८ वी ते १० वी : प्रथम : ओवी बनकर, द्वितीय : ऋषभ पाटील, तृतीय : रुद्र बाभूळगावकर, समृद्धी नेवे, उत्तेजनार्थ : अनुष्का मदने.
या कार्यक्रमास आठव्या काव्यवाचन संमेलनाचे अध्यक्ष प्रा. संपत गर्जे, चाटे कोचिंग क्लासेसचे संचालक गोपीचंद चाटे, मोरया शिक्षण संस्थेच्या संस्थापिका शकुंतला माटे, संस्थेचे अध्यक्ष स्वप्निल शेडगे, खजिनदार रणजित सावंत, विश्वस्त ऋत्विक पिसोळकर, कार्यकारी सदस्या प्रतिभाताई कुलकर्णी आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. यश अग्रेसर यांनी, तर आभार श्रीमती प्रतिभाताई कुलकर्णी यांनी मानले.