भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच….

*भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच.. शशिकांत पाटोळे*
विशाखापट्टणम : कर्णधार एलिसा हीली हिच्या शतकी खेळीनंतर एलिसा पेरीनं केलेल्या आश्वासक खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघानं विक्रमी धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करुन दाखवला. विशाखापट्टणमच्या मैदानात रंगलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील १३ व्या सामन्यात भारतीय संघानं पहिल्यांदा फलंदाजी केली. स्मृती आणि प्रतीकाच्या दिमाखदार खेळीच्या जोरावर टीम इंडियानं वर्ल्ड कप स्पर्धेत धावफलकावर विक्रमी ३३० धावा लावल्या होत्या. पण ऑस्ट्रेलियासमोर ही धावसंख्याही कमी पडली. अखेरच्या षटकात अमनजोत कौर आणि श्री चरणी यांनी टीम इंडियाच्या कमबॅकची आस निर्माण केली, पण शेवटी एलिसा पेरीनं सिक्सर मारत एक षटक आणि ३ विकेट्स शिल्लक राखून ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक विजय निश्चित केला.
*कॅप्टन हिलीची सेंच्रुयी, स्नायू दुखापतीमुळे मैदान सोडणाऱ्या पेरीनं पुन्हा बॅटिंगला येत सिक्सर मारत संपवली मॅच*
भारतीय संघाने दिलेल्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हीली हिने आपल्या बॅटिंगमधील क्लास दाखवत संघाला विजय मिळवून देण्यात सर्वात आघाडीवर राहिली. २०२२ च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तिच्या भात्यातून पहिलं शतक पाहायला मिळाले. तिने १०७ चेंडूत १४२ धावांची खेळी करत सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं सेट केला. ज्या एलिसा पेरीनं स्नायू दुखापतीमुळे मैदान सोडलं होत ती पुन्हा मैदानात उतरली आणि तिने ५२ चेंडूत नाबाद ४७ धावांची खेळी करत सिक्सर मारत संघाच्या विक्रमी विजयावर शिक्कामोर्तब केला. या दोघींशिवाय फीबी लिचफिल्ड ४० (३९), गार्डनर ४५ (४६) यांनी उपयुक्त धावसंख्या करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
*क्रांती गौड आणि स्नेह राणाचा विकेटचा रकाना रिकामाच*
अखेरच्या षटकात अमनजोत कौर आणि श्री चरणी यांनी टीम इंडियाच्या कमबॅकची आस निर्माण केली होती. पण पेरीनं स्नेह राणा घेऊनआलेल्या ४९ व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर षटकार मारत ३ विकेट आणि ६ चेंडू शिल्लक राखून संघाचा विजय निश्चित केला. धावांचा बचाव करताना भारताकडून श्री चरणी हिने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. दीप्ती आणि अमनजोत कौर यांनी प्रत्येकी १-१ विकेट आपल्या खात्यात जमा केली. गोलंदाजीत क्रांती गौड आणि स्नेह राणाचा विकेटचा रकाना रिकामाच राहिला. तेही टीम इंडिया मागे पडण्याचे एक कारण राहिले.
*विक्रमी धावंसख्या उभारली, पण अखेरच्या षटकात टीम इंडिया कमी पडली*
स्मृती मानधना ८० (६६) आणि प्रतीका रावल ७५ (९६) या जोडीनं भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली होती. दोघींनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावांची भागीदारी रचली. पण त्यानंतर भारतीय संघाचा डाव गडबडला. अखेरच्या षटकात भारतीय संघाने ३६ धावांत ६ विकेट्स गमावल्या. ७ चेंडू असताना टीम इंडिया ऑलआउट झाली. ही खराब कामगिरी सामन्यात टीम इंडियाला बॅकफूटवर घेऊन जाणारी ठरली.

