वर्ल्डकप जिंकून रणरागिनींनी इतिहासच घडवला नाही तर भारतीयांचे मनही जिंकले

वर्ल्डकप जिंकून रणरागिनींनी इतिहासच घडवला नाही तर भारतीयांचे मनही जिंकले
दि. ०३. महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 299 धावांचं आव्हान ठेवलं होतं. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद 246 धावाच करता आला. यासह भारताने 52 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. भारताकडून दीप्ती शर्माने 9.3 षटकांत 39 धावा देत पाच विकेट्स घेतल्या, तर शेफाली वर्माने दोन विकेट्स घेतल्या.
त्याआधी, भारताकडून शेफालीनं सर्वाधिक 87 तर, दीप्तीनं 58, स्मृती मंधानानं 45 आणि ऋचा घोषनं 34 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या खाकानं 3 विकेट घेतल्या.

दरम्यान टॉसपूर्वी नवी मुंबईत पावसाला सुरुवात झाल्यामुळं चाहत्यांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण पाहायला मिळालं होतं.
पण पाच वाजता सामना सुरू झाल्यानं ओव्हर कमी करण्यात आल्या नाहीत. मैदानावर प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहानने भारताचं राष्ट्रगीत गायलं.
वन डे क्रिकेटमध्ये भारताच्या महिला टीमनं विश्वचषकाची फायनल गाठण्याची ही तिसरी वेळ ठरली. याआधी 2005 आणि 2017 साली भारताला उपविजेतेपद मिळालं होतं.
वर्ल्डकप जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौर काय म्हणाली?
आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकून भारतीय संघानं विश्वविजेतेपद पटकावलं आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरनं या विजयाचं श्रेय प्रेक्षक, बीसीसीआय, निवड समिती आणि संघातील सदस्यांना दिलं आहे.
“मी प्रेक्षकांची आभारी आहे. आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद. या विजयाचं श्रेय बीसीसीआय, निवड समिती आणि आम्हाला पाठिंबा देणाऱ्यांना जातं.”, हरमनप्रीतनं म्हटलंय.
या स्पर्धेत भारतीय संघाला लीग स्टेजमध्ये सलग तीन सामने गमवावे लागले होते. त्यावर, असे विचारले असता की, “महिला विश्वचषकाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे पुनरागमन आहे, कारण भारतानं सलग तीन सामने गमावलेले. अशा वेळी तुम्ही संघाला काय सांगितलेलं?”
त्यावर हरमनप्रीतनं म्हटलंय, “आमचा स्वतःवर विश्वास होता. आम्ही सलग तीन सामने गमावलेले पण आम्हाला माहित होतं की या संघात काहीतरी खास करण्याची क्षमता आहे. संघातील प्रत्येक सदस्याला याचं श्रेय जातं.”
“त्या सकारात्मक राहिल्या, पुढील सामन्यांमध्ये आपल्याला काय करावं लागेल, हे त्यांना माहित होतं. त्यासाठी त्यांनी रात्रंदिवस मेहनत केली. हा संघ या विजयास पात्र आहे.”

भारतीय महिला संघानं पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावलं आहे. यापूर्वी भारतीय महिला संघानं दोन वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
दक्षिण आफ्रिकेची इनिंग
भारतीय बोलर्सनी दक्षिण आफ्रिकेच्या बॅटर्सना सुरुवातीच्या 5 ओव्हरमध्ये कसून फलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं.
त्यामुळं पॉवरप्लेच्या पहिल्या 5 ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला फक्त 18 धावाच करता आल्या. रेणुका ठाकूर आणि क्रांती गौड दोघींनी चांगली गोलंदाजी केली.
त्यानंतर मात्र कर्णधार वुल्फार्ट आणि ब्रिट्स यांनी चांगली फलंदाजी करायला सुरुवात केली.
पण 10 व्या ओव्हरमध्ये अमनज्योतने एक उत्कृष्ट थ्रो करत ब्रिट्सला रनआऊट केलं. त्यामुळं 51 धावांवर दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का बसला.
त्यानंतर 12 व्या ओव्हरमध्ये श्रीचरणीनं बॉशला पायचित बाद करत भारताला दुसरं यश मिळवून दिलं.
15 ओव्हरनंतर दक्षिण आफ्रिकेच्या 2 बाद 78 धावा झाल्या.
त्यानंतर कर्णधार वुल्फार्ट आणि लूस यांनी गोलंदाजीवर हल्ला चढवला. वुल्फार्टनं 101 धावांची शतकी खेळी केली. पण हरमनप्रीतनं शेफालीला चेडू सोपवला आणि तिनं कामगिरी चोख बजावली.
तिनं आधी लूस आणि नंतर काप या दोघींना बाद करत, भारताला पुन्हा पुनरागमन करण्याची संधी दिली.
भारताची इनिंग
भारताच्या स्मृती मंधाना आणि शेफाली वर्मा यांनी भारताकडून फलंदाजीला सुरुवात केली.
मेरीजन कापने फायनलमध्ये पहिलीच ओव्हर मेडन टाकली. पावसामुळं खेळपट्टीतून सुरुवातीला गोलंदाजांना मदत मिळू शकते. त्यामुळ स्मृतीनं अत्यंत शांतपणे पहिली ओव्हर खेळली. कारण कापनं सेमिफायनलमध्ये अत्यंत घातक गोलंदाजी केल्याचं पाहायला मिळालं होतं.
मात्र, शेफाली वर्मान दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर फटका लगावत चौकार खेचला आणि इरादे स्पष्ट केलं.
त्यामुळं पहिल्या पाच ओव्हरमध्ये भारतानं बिनबाद 31 धावा केल्या. सातव्या ओव्हरमध्ये स्मृती आणि शेफाली यांनी 50 धावांची भागिदारी केली. तर 10 ओव्हरमध्ये भारताच्या बिनबाद 64 धावा झाल्या होत्या.
ड्रिंक्सपर्यंत 16 ओव्हरमध्ये भारतानं बिनबाद 92 धावा केल्या होत्या. तर 18 व्या ओव्हरमध्ये भारतानं बिनबाद 100 धावांचा टप्पा गाठला. शेफाली आणि स्मृतीनं शतकी भागिदारी केली. पण ही भागिदारी 104 धावांपर्यंतच पोहोचली.
चांगली भागिदारी होत असतानाच. स्मृती मंधाना 45 धावांवर बाद झाली. ट्रयॉनच्या गोलंदाजीवर विकेटकिपरच्या हातून ती झेलबाद झाली.
शेफाली वर्मानं मात्र अर्धशतकी खेळी करत, ऐनवेळी झालेली तिची निवड सार्थ ठरवली. 58 धावांवर शेफालीचा झेल सुटल्यानं तिला जीवनदानही मिळालं.
25 ओव्हरनंतर भारतानं 1 बाद 151 धावा केल्या होत्या. शेफालीनं जेमिबरोबरही अर्धशतकी भागिदारी केली. पण 87 धावांवर असताना खाकाच्या गोलंदाजीवर ती झेलबाद झाली.
त्यानंतर 30 व्या ओव्हरमध्ये भारताला आणखी एक धक्का बसला. जेमिमा 24 धावांवर बाद झाली. शेफाली आणि जेमिमा दोघींनाही खाकानं बाद केलं.
त्यानंतर दिप्ती आणि कर्णधार हरमनप्रीतनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण हरमनप्रीत 20 धावांवर बाद झाली. त्यामुळं भारताची स्थिती 4 बाद 229 अशी झाली.
त्यानंतर अमनज्योतही 12 धावांवर बाद झाली.
ऋचा घोषनं अखेरच्या काही षटकांत फटकेबाजी केल्यामुळं भारताच्या धावा 6 बाद 298 पर्यंत पोहोचल्या. पण तिच्याशिवाय इतर बॅटर्सना अखेरच्या ओव्हर्समध्ये तशी आक्रमक फलंदाजी करता आलेली नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून खाकानं तीन तर मलाबा, डीक्लार्क आणि ट्रॅयॉन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
मास्टर ब्लास्टरची उपस्थिती
भारताचा महान फलंदाज आणि क्रिकेट आयकॅान सचिन तेंडुलकरनंही महिला विश्वचषकाच्या ऐतिहासिक अंतिम सामन्यासाठी हजेरी लावली.
सचिन विश्वचषक ट्रॉफी घेऊन येताच. स्टँडमध्ये चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष केला.
सचिन महिला क्रिकेटला वेळोवेळी पाठिंबा देत आला आहे. याही सामन्यात तो खेळाचा आनंद लुटताना आणि भारतीय टीमला पाठिंबा देताना दिसला.
सचिन शिवाय लिटिल मास्टर सुनील गावस्कर, हिटमॅन रोहित शर्मा आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हेही महिला क्रिकेटपटूंना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील महिला क्रिकेटचं होमग्राऊंड
नवी मुंबईत बदाबदा पाऊस कोसळत असतानाही चाहत्यांनी सामन्यासाठी गर्दी केली. तब्बल 45,000 क्षमतेचे स्टेडियम असतानाही ते काही दिवस आधीच ‘हाऊसफुल’ झालं.
अनेकजण तर सामना सुरू झाल्यावरही कुठे तिकिटं मिळतायत का हे पाहण्याच्या प्रयत्नात होते.
क्रिकेटच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच महिलांच्या एखाद्या मॅचची तिकिटं मिळवणं एवढं कठीण बनलं होतं. महिला क्रिकेटला असा पाठिंबा मिळणं हे एकप्रकारे बदलाचं लक्षण आहे.
तसं मुंबईत कुठल्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी लोक एरवीही बऱ्यापैकी गर्दी करतात. पण नवी मुंबईत महिलांच्या मॅचसाठी लोक कुठून दूरदूरवरून आले, हे महत्त्वाचं आहे.
अर्थात यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. कारण डी. वाय. पाटील स्टेडियम हे जणू भारतीय महिला टीमचं होमग्राऊंडच बनले आहे.
गेल्या काही वर्षांत भारतीय महिला क्रिकेट संघाच्या अनेक सामन्यांची आयोजन याच मैदानात झालं होतं.
इथे नियमित येणाऱ्या चाहत्यांचे काही ग्रुप्सच झाले आहेत जे वेगवेगळ्या लयबद्ध घोषणा देत खेळाडूंचा उत्साह वाढवतात. या गटांच मुली आणि महिला चाहत्यांची संख्याही मोठी होती आणि फायनलमध्येही त्या मोठ्या संख्येने आपल्या टीमला सपोर्ट करायला आल्या होत्या.

