कॅम्प परिसरातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ

कॅम्प परिसरातील लॉजमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ
पुणे; दि.२६ (शशिकांत पाटोळे) : गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वाई (जि. सातारा) येथील एका तरुणाने पुण्यातील कॅम्प परिसरातील एका लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पुणे आणि वाई परिसरात खळबळ उडाली असून बंडगार्डन पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
पीयूष ओसवाल (वय २७, रा. वाई, जि. सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पीयूष हा गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी वाई पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते.दरम्यान, बुधवारी दुपारी पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या मुकेश लॉजच्या व्यवस्थापकांनी बंडगार्डन पोलिसांना माहिती दिली.
लॉजमधील एका खोलीतून तीव्र दुर्गंधी येत असून दरवाजा आतून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी दरवाजा उघडल्यानंतर खोलीत पीयूष ओसवाल याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. खोलीत प्रचंड दुर्गंधी पसरलेली असल्याने त्याने एक ते दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.या प्रकरणाची माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले की, पीयूष ओसवाल हा मिसिंग असल्याची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पुढील तपास सुरू असून आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पीयूषचे वडील सराफा व्यवसायिक असून कुटुंबीयांना या घटनेने मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येचे कारण समजण्यासाठी पोलिसांकडून त्याचे मोबाईल कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार तसेच वैयक्तिक आयुष्याबाबत चौकशी करण्यात येत आहे.दरम्यान, या घटनेमुळे कॅम्प परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बंडगार्डन पोलीस पुढील तपास करत असून सर्व बाबींचा सखोल तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

