गुन्हेगारी

बिबवेवाडीत ८ वर्षांपासून सुरू असलेली नियमबाह्य वाहतूक, भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला पिकअप महापालिका व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

*बिबवेवाडीत ८ वर्षांपासून सुरू असलेली नियमबाह्य वाहतूक, भीमसेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडला पिकअप महापालिका व पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*

पुणे; दि. ०१. (शशिकांत पाटोळे) : पुणे शहरात नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणाऱ्या बेकायदेशीर चिकन वेस्टेज वाहतुकीचा गंभीर प्रकार बिबवेवाडी परिसरात उघडकीस आला आहे. काल रात्री भीम सेना संघटनेच्या सतर्क कार्यकर्त्यांनी संशयास्पदरीत्या फिरणारा महिंद्रा पिकअप टेम्पो अडवून तपासणी केली असता, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सडलेला चिकन कचरा (चिकन वेस्टेज) आढळून आला.

धक्कादायक बाब म्हणजे, या चिकन वेस्टेजचे संकलन व वाहतूक करण्यासाठी पुणे महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी संबंधित चालक किंवा वाहन मालकाकडे नव्हती. नियम धाब्यावर बसवून हा मांसकचरा रात्रीच्या अंधारात शहरभर फिरवला जात असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

*८ वर्षांपासून बेकायदेशीर वाहतूक* 

तपासादरम्यान वाहन मालकाकडूनच धक्कादायक माहिती समोर आली असून, हा पिकअप गेल्या तब्बल ८ वर्षांपासून पुण्यातील विविध भागांतून चिकन वेस्टेज उचलत असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, एवढ्या दीर्घ काळात महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई न करणे, ही बाब संशयास्पद ठरत आहे.

*चालक-मालकाची अरेरावी, तणावाचे वातावरण*

ही कारवाई करत असताना वाहन चालक महेश तुर्कुंडे आणि वाहन मालक बबन मेंगडे यांनी भीम सेनेचे कार्यकर्ते ओंकार चंदनशिवे व नारायण गायकवाड यांच्याशी उर्मट व अरेरावीच्या भाषेत वागणूक दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

*पोलीसांनी तक्रार का नोंदवली नाही ?*

कार्यकर्त्यांनी सदर वाहन पोलीसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला असता, आश्चर्यकारकरीत्या पोलीसांनी कोणतीही तक्रार नोंदवून न घेता वाहन सोडून दिले, असा गंभीर आरोप करण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाची छाया अधिक गडद झाली आहे.

*नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ*

अशा प्रकारचा सडलेला मांसकचरा रस्त्यावर किंवा मोकळ्या जागी टाकला गेल्यास दुर्गंधी, संसर्गजन्य आजार, कुत्रे-डुक्करांचा उपद्रव तसेच पर्यावरणीय प्रदूषण वाढण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त करत महापालिकेने आणि पोलीस प्रशासनाने तात्काळ कठोर कारवाई करावी, तसेच या संभाव्य रॅकेटची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

*उपस्थित होणारे गंभीर प्रश्न*

▪️ महापालिकेच्या आरोग्य विभागाला हे ८ वर्षे कसे दिसले नाही?

▪️ परवानगीशिवाय वाहन शहरात मोकाट कसे फिरत होते?

▪️ पोलीस तक्रार नोंदवायला का तयार नव्हते?

पुणे शहरात आरोग्याला घातक ठरणाऱ्या बेकायदेशीर कचरा वाहतुकीवर प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button