महाराष्ट्र ग्रामीण

Santosh Deshmukh Case: कोणत्या चुकांमुळे गेला सरपंच संतोष देशमुख यांचा बळी? वाल्मिक कराडने तपास कसा लांबवला?

Santosh Deshmukh Case: कोणत्या चुकांमुळे सरपंच संतोष देशमुख यांचा बळी गेला? कुठे काय, उशीर झाला? जाणून घेऊया सविस्तर.

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये रोज नवनविन अपडेट समोर येत आहे. या हत्या प्रकरणात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. आरोपींनी संतोष देशमुखांचा छळ करत असताना एक ग्रुप व्हिडीओ कॉल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मोकारपंती व्हॉट्सअप ग्रुपवर लाइव्ह व्हिडीओद्वारे दाखवला. एकदा नाही तर तब्बल चार वेळा आरोपींनी व्हिडीओ कॉल केला असल्याचे समोर आले आहे. मोकारपंती ग्रुपवर व्हिडीओ कॉल करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळेच आहे. कृष्णा आंधळेने चार वेळा व्हिडिओ कॉल केला होता, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान कोणत्या चुकांमुळे सरपंच संतोष देशमुख यांचा बळी गेला? कुठे काय, उशीर झाला? जाणून घेऊया सविस्तर.

वाल्मीक कराड, विष्णू चाटे यांनी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला 29 नोव्हेंबर 2024 रोजी पहिल्यांदा खंडणी मागितली. तेव्हाच तक्रार दिली असती, तर 6 डिसेंबरला मस्साजोगमधील कंपनीच्या कार्यालयामध्ये येथे गोंधळ झाला नसता. तेव्हा पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाईचा बडगा न उगारता त्यांच्यासोबत चहापान केलं. तेव्हाच पोलिसांनी कारवाई केली असती तर आजचा दिवस वेगळा असता. कराडचे नाव गुन्ह्यात येण्यासाठीही तब्बल 36 दिवसांचा कालावधी लागला. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठीही सरकारने 73 दिवस उशीर केला.

विष्णू चाटेने 29 नोव्हेंबर 2024 रोजी ‘आवादा’चे अधिकारी सुनील शिंदे यांना कॉल केला. चाटेच्या मोबाईलवरून कराड बोलला. त्याच दिवशी सुदर्शन घुलेने कार्यालयात जाऊन खंडणी मागितली. परंतु शिंदे यांनी नकार दिला. त्यानंतर 6 डिसेंबरला घुलेसह त्याची टोळी मस्साजोगला गेली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरपंच देशमुख यांना बोलावलं. खंडणीला आडवा आल्यानेच या गँगने ही हत्या केल्याचे सीआयडीच्या दोषारोपपत्रातून समोर आले आहे.

काय उशीर झाला ?

29 नोव्हेंबर 2024 : पहिल्यांदा खंडणी मागितली होती, तेव्हा आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तक्रार दिली नाही.

6 डिसेंबर : मस्साजोगमध्ये भांडण झाल्यानंतर पोलिसांनी अॅट्रॉसिटी कलम लावले नव्हते.

9 डिसेंबर : अपहरण झाल्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्यास उशीर केला.

10 डिसेंबर : या प्रकरणात विष्णू चाटेचं नाव घेण्यास उशीर केला.

11 डिसेंबर : वाल्मीक कराडसह इतरांवर खंडणीचा गुन्हा उशिराने दाखल केला गेला.

31 डिसेंबर : वाल्मीक कराड उशिराने सीआयडीला शरण आला.

14 जानेवारी 2025 : उशिराने वाल्मीक कराडचा हत्या प्रकरणात समावेश करण्यात आला.

4 मार्च 2025 : धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात आला.

चाटेने मोबाइल फेकून महत्त्वाचा पुरावा केला नष्ट

आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोनवरून त्यानी खंडणी मागितली. तसेच इतर काही महत्त्वाचे पुरावे विष्णू चाटेच्या मोबाइलमध्ये होते. मात्र, तो फरार असताना त्याने त्याचा फोन फेकून देत महत्त्वाचा पुरावा नष्ट केल्याचा दावा सीआयडीने दोषारोपपत्रात केला आहे.

मोकारपंती ग्रुपवर देशमुखांच्या छळाचे लाईव्ह व्हिडीओ

मोकारपंती नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर संतोष देशमुख यांच्या छळाचे लाईव्ह व्हिडीओ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर कॉल करणारा आरोपी हा फरार आरोपी कृष्णा आंधळे हाच आहे. कृष्णा आंधळे याने चार वेळा मोकारपंती व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडीओ कॉल केला होता. मोकारपंती व्हॉट्सअप ग्रुप देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा होता. याच व्हॉट्सअप ग्रुपवर कृष्णा आंधळे व्हिडीओ कॉल करत होता.

कृष्णा आंधळेने केले मोकारपंती ग्रुपवर व्हिडिओ कॉल

1) पहिला कॉल 9 डिसेंबर रोजी 5 वाजून 14 मिनिट , 44 सेकंद (कॉल ड्युरेशन 17 सेकंद)

2) दुसरा व्हिडिओ कॉल 5 वाजून 16 मिंट 45 (कॉल ड्यूरेशन 17 सेकंद)

3) तिसरा व्हिडिओ कॉल 5 वाजून 19 मिनिट (कॉल दुरेशन 2.03 मिनिट)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button