महाराष्ट्र ग्रामीण

वडिलांना औरंगजेबाची उपमा, सुनिल तटकरेंचा लेक संतापला; शिवसेना आमदार थोरवेंचा व्हिडिओ दाखवला

सुनिल तटकरेंचा

राजकारण करायला गेलात तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल. परंतु, पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील अशी जोरदार टीका महेंद्र थोरवे यांनी सुनिल तटकरेंवर केली होती.

रायगड : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो, अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती. त्यानंतर, तटकरे यांच्या याच टीकेचा धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातूनच खासदार सुनील तटकरे यांच्यावर पलटवार केला. पंचांचा निर्णय अंतिम असतो,आणि या सामन्यात तुम्ही कॅप्टन होत असताना सर्व मिळायला हवं असं चालणार नाही. क्रिकेट खेळाचे उदाहरणे आम्हाला देऊ नका आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, असे म्हणत थोरवे यांनी तटकरेंची तुलना थेट औरंगजेबासोबत केली होती. त्यामुळे, रायगडमधील (Raigad) तटकरे-गोगावले-थोरवे वाद काही केल्या कमी होताना दिसून येत नाही. आता, सुनिल तटकरे यांच्या सुपुत्राने आमदार महेंद्र थोरवे यांनी गद्दारी केली म्हणत व्हिडिओच दाखवले आहेत.

राजकारण करायला गेलात तर तिथे तुम्हाला क्षणिक सुख मिळेल. परंतु, पुढील काळात याचे वाईट परिणाम आपणास भोगावे लागतील अशी जोरदार टीका महेंद्र थोरवे यांनी सुनिल तटकरेंवर केली होती. तसेच, ‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाचा दाखल देत सुनील तटकरे यांना थोरवे यांनी औरंगजेबाची उपमा दिली, आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय, असे म्हणत तटकरेंना लक्ष्य केलं होतं. आता, तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

महेंद्र थोरवे ही कालची पिलावळ असून हेच गद्दारीचे पिलावळ आहेत, याशिवाय सुनील तटकरे हे राजकारणात 40 वर्ष कार्यरत असून ते जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे महेंद्र थोरवे जर का वल्गना करत असतील तर त्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा अनिकेत तटकरे यांनी थोरवे यांना दिला आहे. तसेच, यावेळी विधानसभा निवडणूक काळात थोरवेंनी आमच्यासोबत गद्दारी केली असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांसमवेतचे त्यांचे व्हिडिओ देखील दाखवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button