
सुनेत्रा पवार शपथ घेण्याआधी शरद पवारांकडून मोठा गौप्यस्फोट

पुणे; दि. ३१ (शशिकांत पाटोळे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोनच दिवसात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अस्थी विसर्जन केल्यावर रात्रीत सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या. आज सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी एकत्र येणार ही फक्त चर्चाच राहिली. शरद पवार यांनीही आपल्याला सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीबाबत काही माहिती नसल्याचं सांगितलं आहे. आज सकाळी शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत मोठे विधान केले आहे. त्यासोबतच १२ तारखेलाच याची घोषणा होणार होती असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला आहे.
*शरद पवार काय म्हणाले?*
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं यासाठी गेली चार महिने चर्चा होत होती. त्याचं नेतृत्व जयंत पाटील आणि अजित पवार करत होते. सगळी चर्चा या दोघांनी केली, विलिनीकरणाची १२ तारखेला घोषणा होणार होती, मात्र या अपघातामुळे खंड पडला असं चित्र दिसत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता सुरू आहेत. त्याची जबाबदारी अजित पवारांकडे होती, यामध्ये मी सहभागी नव्हतो, असं शरद पवार म्हणाले. शरद पवारानंतर त्यांचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनीही याला दुजोरा दिला.
जिल्हा परिषद निवडणुका लागल्या नसत्या तर विलिनीकरण कधीच झालं असतं.अजित पवार परखड होते, त्यांनी होय म्हटलं होतं.त्यांची इच्छा पूर्ण करायची की नाही हे त्यांनी ठरवावं. चर्चा झाली होती म्हणून तर आम्ही घड्याळावर लढलो, असं शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.
सुनेत्रा पवार शपथ घेणार हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय- शरद पवारगेली अनेक वर्ष संघटनेच आणि सामान्य लोकांशी सुसंवाद ठेऊन एक कतृत्त्ववान नेता होते. त्याचं वैशिष्ट होतं की, लोकांच्या प्रश्नांची माहिती घ्यायची लोकांना न्याय देता येईल या प्रकारचं काम करता येईल. दुसरं वैशिष्ट म्हणजे कामाची सुरूवात त्यांच्या दैनंदिन कामाची सुरूवात सकाळी व्हायची, आज ते हयात असते तर आज घरी नसते. आघात आम्हा सगळ्यांवर असून सध्याच्या स्थितीचा सामना करणं आव्हानात्मक आहे. एनसीपीने काय करावं, यावर भाष्य करणार नाही. सुनेत्रा पवार शपथ घेणार हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे. झालेली चर्चा इथे नाही मुंबईत झाली. प्रफुल पटेल, सुनील तटकरे पक्षाचे प्रमुख आहेत. तो त्यांचा अधिकार आहे. नरेश अरोरा हा कोण आहे हे माहिती नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.




